स्वागत
कंपन्यांचे पतमापन
कंपन्यांचे पतमापन करणार्या संस्था [क्रेडिट रेटिंग एजन्सीज] त्या कंपन्यांच्या आर्थिक, औद्योगिक, व्यावसायिक आणि व्यवस्थापकीय घटकांचे विश्लेषण करतात. कंपनी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्या क्षेत्रातील उद्योगाचे स्वरूप आणि स्पर्धा, उत्पादनांच्या मागणी-पुरवठ्याची स्थिती, उद्योगरचना हंगामी आहे की कायमस्वरूपी, तसेच या उद्योग क्षेत्राबाबत सरकारी धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी इत्यादी मुद्द्यांचा विचार करूनच त्या उद्योगक्षेत्राचे जोखीम विश्लेषण करण्यात येते. कंपनी उत्पादित करीत असलेल्या उत्पादनांचे बाजारपेठेतील स्थान, स्पर्धेचे फायदे-तोटे, विक्री-वितरण व्यवस्थेतील व्यवस्थापन तसेच ग्राहक आणि उत्पादने यांच्यातील संबंध या घटकांवर सुद्धा अभ्यास केन्द्रित केलेला असतो. उत्पादन ठिकाणाचा, अधिकाधिक कार्यालयांचा किंवा शाखांचा होणारा लाभ, कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील सुसंवाद, तंत्रज्ञानाचे फायदे घेवून वाढीव उत्पादन क्षमतेची उभारणी या सर्व बाबींचा इतर स्पर्धक कंपन्यांशी तुलनात्मक विश्लेषण करून कंपनीच्या व्यवहारातील कायदेशीरता तपासली जाते.
कंपनीचे आर्थिक विश्लेषण करताना लेखापरीक्षणाचा दर्जा, अकौंटिंगची पद्धत, सुरक्षित उत्पन्नाचे मार्ग, रोख रकमेची पर्याप्तता, तसेच आर्थिक तरलता [लिक्विडिटी] अभ्यासून कंपंनीच्या पतमापनातील महत्वाचा टप्पा गाठला जातो. व्यवस्थापनांचा अभ्यास करताना त्यांचा पूर्वेतिहास, आयोजन-नियोजनाची पद्धत आणि नियंत्रण इत्यादींचा विचार करून व्यवस्थापनाची उद्दिष्टे, प्रणाली आणि तत्व अभ्यासले जातात.
वित्तीय क्षेत्रातील किंवा तत्सम आर्थिक क्षेत्रातील कंपन्यांच्या पतमापन प्रक्रियेत कंपंनीच्या वित्तसहाय्याची रचना आणि नियंत्रणात्मक चौकटीचा अभ्यास केला जातो. बाजारपेठेतील विविध प्रवाहाचा कंपंनींवर होणारा परिणाम, भांडवली पर्याप्तता, निधीचे स्त्रोत, मालमत्तेची गुणवत्ता, रोखतेचे नियोजन आणि नफ्याचे विद्यमान प्रमाण तसेच करदायित्व यांचे विश्लेषण करून पतमापनाचा दर्जा निश्चित केला जातो. क्रिसील, इक्रा आणि केअर या तीन पतमापन संस्था अधिक परिचित आहेत. याच संस्था कंपन्यांचे सर्व बाजूंनी पतमापन करतात. पतमापन श्रेणी गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतात. यासाठीच प्रत्येक गुंतवणूकदाराने या पतमापन श्रेणी बघूनच त्या त्या कंपन्यांच्या ठेव योजनेत, पतपत्रांमध्ये, शेअर्समध्ये किंवा कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करणे अपेक्षित असते.
क्रिसिल, इक्रा आणि केअर या तीन पतमापन संस्थांद्वारे कंपन्यांच्या मुदत ठेवींसाठी किंवा कर्जरोख्यांसाठी ज्या श्रेणी देतात त्या श्रेणींवरून त्या गुंतवणुकीतील जोखीमेची व्याप्ती स्पष्ट होत असते. या श्रेणी दरवर्षी केल्या जाणार्या पतमापनाशी निगडीत असतात. मागीलवर्षी उच्च श्रेणी मिळवलेली कंपनी पुढील वर्षी उच्च श्रेणीतच असेल असे ठामपणे सांगता येत नसते. पण मागील वर्षी मिळालेली उच्च श्रेणी चालू वर्षीही हीच श्रेणी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असते. म्हणूनच गुंतवणूकदारांनी उच्च श्रेणी बघून गुंतवणूक केल्यावर दरवर्षी त्या कंपनीला कोणती श्रेणी बहाल झाली आहे याची पतमापन संस्थांकडून आणि कंपंनीच्या नोंदणीकृत कार्यालयांकडून खातरजमा करणे हिताचे असते. मुळात कंपनी मुदत ठेवींचे साधन पूर्णत: असुरक्षित म्हणून गणले जाते. त्यामुळे भविष्यात कंपनी जर गाळात गेली किंवा बंद पडली तर व्याजच नव्हे तर मुद्दल सुद्धा मिळण्याची शाश्वती नसते. आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रतिष्ठित कंपन्यांच्या मुदत ठेव योजनांतील गुंतवणुकीत इतर कंपन्यांच्या तुलनेत व्याज कमी मिळत असले तरीही मुद्दलाची आणि शक्य तर व्याजाची हमी अपेक्षिता येते.
‘एएए’ ही श्रेणी मिळवलेली कंपनी ठेव आणि व्याज वेळेवर परतफेड करण्याच्या दृष्टीने ‘सर्वात जास्त सुरक्षित आणि सक्षम’ असल्याचे दर्शविते. ‘एए’ ही श्रेणी मिळवलेली कंपनी ठेव आणि व्याज वेळेवर परतफेड करण्याच्या दृष्टीने ‘जास्त सुरक्षित आणि सक्षम’ असल्याचे दर्शवीत असली तरीही ‘एएए’ श्रेणीच्या तुलनेत तोकडी पडते. ‘ए’ ही श्रेणी असलेली कमपणी फक्त ठेवीच्या सुरक्षिततेबाबत ग्वाही देते. ‘बी’ ही श्रेणी ठेवी परतफेडीबाबत संपूर्ण सुरक्षित असल्याची ग्वाही देत नाही. ‘सी’ ही श्रेणी ठेवी संबंधात असुरक्षितता स्पष्ट करून कंपनीची ठेव परतफेडीची क्षमता नसल्याचे दर्शविते. ‘डी’ ही श्रेणी मिळालेल्या कंपनीशी ठेवी संबंधात कोणताही व्यवहार करणे अत्यंत असुरक्षित असल्याचे स्पष्ट करून कंपनीची ठेव परतफेडीची क्षमता अजिबातच नसल्याचे दर्शविते. ‘सी’ आणि ‘डी’ या श्रेणी प्राप्त कंपन्यांशी मुदत ठेवींबाबतचा केलेला व्यवहार अत्यंत जोखीमयुक्त आणि धोकादायक ठरू शकत असल्याने अशा कंपन्यात गुंतवणूकदारांनी ठेवी ठेवू नव्हेत.
Our Sponsors