स्वागत
सोन्याची शुद्धता
सोन्याच्या अलंकारांची खरेदी करताना ग्राहकांच्या मनात नेहमीच शंका उपस्थित होत असते, हे अलंकार खरचं २३ कॅरेटचे असतील की २२ कॅरेटचे असतील. सोने हा खूपच मृदु धातू असल्याने १०० टक्के शुद्ध सोन्याचे दागिने घडविणे अशक्य ठरते. त्यासाठी अलंकारच्या स्वरूपानुसार सोन्यात जस्त, तांबे किंवा चांदी या धातूंचे मिश्रण केले जाते. या अलंकारांमध्ये या धातूंचे मिश्रण एकजीव होण्यासाठी केडियम हा धातू उत्प्रेरक [catalyst]म्हणून वापरला जातो. केडियम हा धातू सोन्यात कधीही एकजीव न होता इतर धातूंच्या मिश्रणाची क्रिया सुलभपणे पार पाडतो. सोन्याचे शुद्धता मोजण्याचे परिमाण कॅरेट आहे. सोन्याची शुद्धता दर्शविण्यासाठी भारतीय मानक ब्युरो [BIS –Bureau of Indian Standards]या संस्थेने शुद्धता आणि सूक्ष्मता श्रेणी ठरवून दिल्या आहेत. या संस्थेमार्फत होंलमार्कचे चिन्ह दिले जाते. ते मिळण्यासाठी अलंकार सोन्याच्या शुद्धतेच्या परीक्षणासाठी द्यावे लागतात. हे परीक्षण करण्यास साधारण पाच ते सहा तास लागतात. भारतीय मानक ब्युरोच्या मान्यता प्राप्त किंवा संदर्भित प्रयोगशाळेतून होंलमार्क चिन्ह असलेल्या दागिन्यांच्या शुद्धतेची पुन्हा पडताळणी करता येते. अर्थातच एका नमुन्यासाठी परीक्षण शुल्क पंचवीस रुपये आहे. २४ कॅरेटचे सोने अत्यंत शुद्ध स्वरुपातील म्हणजेच शंभर नंबरी सोने मानले जाते. २३कॅरेटचे सोने म्हणजे ९५८ सूक्ष्मता श्रेणी, २२ कॅरेटचे सोने म्हणजे ९१६ सूक्ष्मता श्रेणी, २१ कॅरेटचे सोने म्हणजे ८७५ सूक्ष्मता श्रेणी, १८ कॅरेटचे सोने म्हणजे ७५० सूक्ष्मता श्रेणी, १७ कॅरेटचे सोने म्हणजे ७०८ सूक्ष्मता श्रेणी, १४ कॅरेटचे सोने म्हणजे ५८५ सूक्ष्मता श्रेणी आणि ९ कॅरेटचे सोने म्हणजे ३७५ सूक्ष्मता श्रेणी अशा प्रकारे शुद्धता आणि सूक्ष्मता श्रेणींचे वर्गीकरण असते. ही सूक्ष्मता श्रेणी त्या शुद्ध सोन्याचे प्रमाण दर्शवीत असते. उदाहरण बघायचे तर २३ कॅरेट मध्ये शुद्ध सोन्याचे प्रमाण ९५.८% असते तर १८ कॅरेट मध्ये शुद्ध सोन्याचे प्रमाण ७५% असते.
सोन्यातील गुंतवणुकीची माध्यमे निश्चित करताना स्थानिक सराफ आणि जागतिक बाजारपेठेतील सोन्याचा दर यात तीन ते चार टक्केचा पडणारा फरक लक्षात घेतला जातो. ब्रँडेड कंपन्यांचे सोने किमान २३ टक्क्यांनी महाग पडते. फक्त गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडांचे युनिट्स खरेदी करताना जागतिक बाजारातील सोन्याच्या दराशी संलग्न दर मिळतो. २००६ मध्ये भारतात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडची संकल्पना येऊन आता आठ वर्षे झाली. तरीही हे सुरक्षित आणि सुलभ गुंतवणूक साधन सर्व साधारण गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचलेले नाही. सर्व प्रथम औस्ट्रेलियात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडाची संकल्पना कृतीत आणली गेली. त्यानंतर इंग्लंड आणि अमेरिकेत हे फंड्स आले. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड चालू करणारा देश म्हणून आपल्या भारताचा चौथा क्रमांक लागतो. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदारांना सोने प्रत्यक्ष धातू रूपात किंवा अलंकारांच्या स्वरुपात न घेता डीमॅट खात्यात घेता येते. या सोन्याची शुद्धता ९९ टक्के इतकी असते. या शुद्धतेचा दर्जा प्रमाणित असल्याने गुंतवणूकदार निर्धास्त असतो. एक ग्रॅम सोन्याचे एक गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडचे एक युनिट या परिमाणाने डीमॅट खात्यात व्यवहार केले जातात. शेअरबाजारात या युनिट्सची खरेदी-विक्री करता येते.
गोल्ड ईटीएफ युनिट्सना प्राधान्य का द्यावे?
संपत्ती कर गोल्ड ईटीएफ युनिट्सना आणि गोल्ड फ्यूचर्सना अजिबात लागू नाही. मात्र हा संपत्ती कर ई-गोल्ड युनिट्सला तसेच अलंकार-दागिने आणि धातू रूपातील सोन्यास [वळी, बिस्किट्स,चिप्स किंवा लगडी] लागू आहे. दीर्घ अवधीचा भांडवली नफा कर फायदा गोल्ड ईटीएफ युनिट्सला एक वर्षांनंतर तर ई-गोल्ड युनिट्सला तीन वर्षांनंतर घेता येतो. गोल्ड फ्यूचर्सना हा लाभ उपलब्ध नाही. धातू रूपातील सोन्यास तीन वर्षांनंतर हा भांडवली नफा कर फायदा घेता येतो. गोल्ड ईटीएफ युनिट्सला आणि गोल्ड फ्युचर्स डीमॅट स्वरुपात असल्याने साठवणुकीची गरज नसते. अलंकारातील किंवा धातू रूपातील सोन्याला घरातील कपाटातील लॉकर्स नाहीतर बँकेतील सुरक्षित जमा कक्ष [सेफ डिपोजिट व्होंल्ट] यांना पर्याय नसतो. सुवर्ण मालमत्तेची सुरक्षा फंड हाऊसद्वारे गोल्ड ईटीएफसाठी घेतली जाते. तर ई-गोल्ड बाबतीत ही सुरक्षा कस्टोडियन घेत असतो. गोल्ड फ्यूचर्सच्या बाबतीत डीपोझिटरीतर्फे ही सुरक्षा घेतली जात असते. डीपोझिटरीत असल्याने गोल्ड ईटीएफ युनिट्सना आणि गोल्ड फ्यूचर्सना नामांकनाची [नॉमिनेशन] सुविधा आहे. आवश्यकता नसताना धातुरूपातील सोने खरेदी टाळून डिमॅट स्वरुपात केलेली सुवर्ण खरेदी नेहमीच सर्वच दृष्टीने सुरक्षित, योग्य आणि दीर्घ अवधीत कर लाभ देणारी ठरते.
‘दसरा सण मोठा, नाही सोन्याला तोटा’
दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेला सोने हा धातू जागतिक आणि भारतीय अर्थकारणात महत्वाचा घटक ठरला आहे. प्रत्येक देशाच्या राखीव निधीत सोन्याचा साठा असतो. भारताच्या एकूण राखीव निधीत सोन्याचे प्रमाण सुमारे दहा टक्के म्हणजेच ५५७.७ टन आहे. अमेरिका, जर्मनी आणि चीन यांनी एकूण राखीव निधीत सोन्याचे प्रमाण अनुक्रमे ७७ टक्के[८१३५ टन], ७२ टक्के [३३९२ टन] आणि एक टक्का [१०५४ टन] आहे.
सोन्याच्या भावात जे चढ-उतार होण्यास तीन घटक कारणीभूत ठरतात -आंतरराष्ट्रीय अस्थिर अर्थव्यवस्था, चलनवाढ आणि कच्च्या तेलाच्या किंमती. तसेच सोन्याच्या खाणीतून येणार्या उत्पादनात वर्षागणिक मोठी घट होत आहे. २०११ च्या तुलनेत २०१२ मध्ये तर चाळीस टक्के सोने उत्पादनात घट झाली होती. काही खाणी संदर्भात खाण कामाचा वाढणारा खर्च, कायदेशीर अडचणी आणि भौगोलिक प्रश्न उभे राहिल्याने सोन्याच्या उत्पादनात घट होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सणासुदीच्या मुहूर्तावर सोनेच खरेदी करायचेच असेल तर ते धातू स्वरुपात घेण्यापेक्षा एक्स्चेंज ट्रेडेड फंड युनिट्सच्या [इटीएफ] स्वरुपात खरेदी करणे इष्ट ठरते. त्यात वजनाची घट होणे शक्य नसते. किमान एक ग्राम शुद्ध सोन्याच्या युनिट्सची खरेदी डीमॅट खात्यात खात्यात करता येते. वेळप्रसंगी शेअर ब्रोकरला सांगून ती युनिट्स विकता येतात. सोने वर्षभरात किमान दहा ते बारा टक्के उत्पन्नदर दर्शविण्याचे शक्यता वर्तविली जात आहे. सोन्यातील गुंतवणूक इटीएफमध्ये अधिक श्रेयस्कर असेल. हे कागदावरील सोने लॉकरमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावे लागत नाही. काही मोठे सराफ-ज्युवेलर्स तुमच्याकडील इटीएफ स्वरुपातील सोन्याची युनिट्स खरेदी करून त्याचे दागिने बनवून देतात. त्यामुळे शुद्ध सोन्याबरोबरच सुरक्षिततेला प्राधान्य मिळून आपली आवड जपून गरज भागली जाते.
सोन्याची आंतर्राष्ट्रीय बाजारातील किंमत निश्चित करताना बर्कलेज, एचएसबीसी, बँक ऑफ नोव्हा स्कोटीया आणि सोशीएट जनरल कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून दिवसातून दोनवेळा निश्चित करतात. लंडनमध्ये सदस्य बँका या कॉन्फरन्स कॉलमध्ये सामील होऊन प्रत्येक बँकेला त्यांच्या त्यांच्या ग्राहकांच्या वतीने किती गोल्ड बार्सची खरेदी किंवा विक्री करायची आहे ते स्पष्ट करतात. विविध देशांच्या केंद्रीय बँका आणि खाण कंपन्या यांच्यातील व्यवहारांवरून या किंमतीतील वध-घट होत असते. मागणी आणि पुरवठयातील समतोलपणा बघत ‘गोल्ड फिक्स’ मूल्य निश्चित केले जाते. ही फिक्सिंग प्राइज प्रत्यक्षात झालेल्या व्यवहारांवर आधारित असते. लंडन गोल्ड फिक्स मूल्य आज जगभरातील सोन्याच्या व्यवहारात महत्वाची भूमिका बजावत असते. विक्री करारांची सौदापूर्ती करण्यासाठी खाण कंपन्यांसाठी तसेच गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स साठी महत्वाचे गोल्ड फिक्सिंग प्राइज आवश्यक ठरली आहे. भारतातील असंख्य ज्युवेलर्स, कोंईन डिलर्स, तसेच अलंकार निर्मिती कंपन्या किरकोळ ग्राहकांसाठी बँकांकडून सोन्याची खरेदी करताना ‘गोल्ड फिक्सिंग प्राइज’वरच लक्ष देतात.
Our Sponsors